कोरोनामुळे या देशात एका दिवसांत तब्बल ३००० मृत्यू

0
244

अमेरिका, दि.१२ (पीसीबी) ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

अमेरिकेने करोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही १०० दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीनं फायझरच्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. या मुद्दावर झालेली बैठक तब्बल आठ तास सुरु होती. बैठकीदरम्यान एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी १७ विरूद्ध ४ मतांनी लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली. तर एक सदस्या या प्रक्रियेत सहभागी झाला नव्हता.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे, असं एका तज्ज्ञानं सांगितलं. यापूर्वी फायझरच्या लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियानं मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीनं परवानगी मागितली आहे.

३ हजार मृत्यू
गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत करोनामुळे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली. हा घटनाक्रम संपूर्ण परिस्थिती अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. आम्ही वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारी आहोत. अमेरिकेसमोर लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाचं आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राष्ट्राध्य जो बायडेन यांनी दिली.