Maharashtra

कोरोनामुळे पतीचे निधन, दुःख सहन न झाल्याने माय लेकीची नस कापून आत्महत्या

By PCB Author

August 06, 2020

औरंगाबाद, दि. ६ (पीसीबी) : औरंगाबादमध्ये पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याचे दुःख असहाय्य झाल्यानं पत्नीनं आपल्या जुळ्या मुलगा आणि मुलीसह धारदार वस्तूने दोनही हाताच्या नसा कापल्या.या घटनेत मायलेकीचा मृत्यू झालाय तर मुलगा वाचला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही खळबळजनक घटना उस्मानपुरा भागातील न्यू गणेशनगर मधील स्वामी समर्थ नगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

समीना रुस्तुम शेख(42) आणि आयेशा रुस्तुम शेख (17) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नाव आहेत. या घटनेत समीर रुस्तुम शेख बचावला आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार समीना यांनी बांधकाम व्यवसायिक रुस्तुम शेख यांच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना समीर आणि आयशा ही जुळी मुलं झाली. रुस्तुम यांचे कोरोनामुळे 31 जुलै रोजी निधन झाले. ते उपचार घेत होते तेव्हा रुस्तुमच काही बरेवाईट झाले मीही मुलाबाळांसह आत्महत्या करेल, असे समीना नातेवाईकांना बोलायची असे त्यांच्या बहिणीने सांगितले.

पतीच्या निधनामुळे समीना आणि तिच्या मुला मुलीचे धक्का बसला. समीना यांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून नातेवाईक त्यांच्यासोबत राहात होते. मंगळवारी रात्री दहा वाजता समीना आयेशा आणि समीर यांनी समीनाची लहान बहिण भाऊ आणि भावजय यांच्यासोबत जेवण केले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्यांनी टीव्ही पाहिला.

त्यानंतर समीनाने गळफास घेण्यासाठी साडी पंख्याला बांधली, मात्र समीरने तिला गळफास घेऊन दिला नाही. यानंतर तिघांनी सुसाईड नोट लिहिली. यात घराच्या लोकांची माफी मागितली आणि प्रत्येकाने दोन्ही हातांच्या नसा धारदार ब्लेडने कापून घेतल्या. या घटनेत तिघेही बेशुद्ध पडले. शेजारी राहणाऱ्या लोकांनी आणि अन्य नातेवाईकाच्या मध्यस्थीने दार तोडले. तेव्हा समीना आणि आयेशा बेडवर तर समीर बेडखाली बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तिघा माय-लेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी समीना आणि आयेशाला तपासून मृत घोषित केले. तर समीरला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.