Desh

कोरोनामध्ये सरकारचा मोठा महत्त्वाचा निर्णय, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याचा मार्ग आता खुला

By PCB Author

October 22, 2020

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता अनलॉक ५.० अंतर्गत व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे कि, पर्यटक व्हिसा आणि इलेक्ट्रॉनिक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात.

जर व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते.