कोरोनाच्या संकटात पत्रकार व्हेंटिलेटरवर

0
304

पिंपरी,दि.२४ (पीसीबी): कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वजण विवंचनेत आहेत. उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग होईल याची भीती तर दुसरीकडे लॉक डाऊनमुळे उद्योग आर्थिक अडचणीत आल्याचे कारण पुढे करत काही उद्योजकांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबलेले आहे. त्यात अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते दुहेरी संकटात सापडले आहेत. समाजाचे दुःख वेशीवर मांडणारे पत्रकार बांधवही संकटात सापडले आहेत. वृत्तपत्रांच्या आवृत्या बंद होऊ लागल्या आहेत. मुद्रित माध्यमे कशी तग धरणार अशी भीती काही भांडवलदार व्यक्त करू लागले असून पत्रकार आता खऱ्या अर्थाने व्हेंटिलेटरवर आले आहेत, असे निरीक्षण जेष्ट पत्रकार संजय माने यांनी नोंदवले आहे.

ते म्हणतात, कोविड 19 हा आजार पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट होत गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉक डाउन घोषित केला. तब्बल 50 दिवस नागरिक लॉक डाउन काळात घरात बंदिस्त आहेत. हातात पुरेसा पैसा नाही, शासनाच्या तोकड्या उपाययोजना तसेच सामाजिक संस्थाकडून अल्प प्रमाणात जीवनाश्यक वस्तूंचे होणारे वाटप, कधी कधी येत असलेली उपासमारीची वेळ ही घुसमट असह्य झाल्याने जीव धोक्यात घालून अनेकजण पायपीट करून गावी निघाले. काहींना जीव गमवावा लागला आहे.
पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार हे स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावत आहेत. या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. त्यांना कोरोना योद्धा संबोधले जात आहे. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या या शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आहे. त्यांची सुरक्षिततेची योग्य ती दक्षता घेतली जाते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कोरोनाच्या घटना, घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मात्र कोरोना योद्धामध्ये गणले जात नाही. त्यांना संस्थेकडून आणि शासकडूनही कसलेच विमा संरक्षण नाही. वृत्तपत्रात बातमीदार म्हणून काम करणाऱ्या काही पत्रकार बांधवाना त्यांचाच मोबाईल घेऊन ऑनलाईन बातमीसाठी स्पॉटवर जाण्यास भाग पडते आहे. जणूकाही वृत्तवाहिनीसाठी आपण काम करत आहोत, अशा अविर्भावात मुद्रित माध्यमात काम करणारे पत्रकार मोबाईलचा हेडफोन घेऊन मुलाखती घेताना दिसून येतात. मोबाईलवर मुलाखती, प्रतिक्रीया घेणे हे आपले काम नसताना, जोखीम पत्करून ते काम करत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोणी घराच्या बाहेर पडेना, अशा स्थितीत पत्रकार स्वतःला अमरत्व मिळाल्याच्या भ्रमात बिनधास्त सर्वत्र वावरतात. कामगार कपातीच्या धोरणात नोकरी गमावण्यात आपला नंबर लागू नये, या मजबुरीमुळे, परिस्थितीपुढे हतबल झालेले पत्रकार वाट्याला येईल ते मुकाट्याने सहन करू लागले आहेत. 


कोरोनाची वाढती रुग्ण संख्या, कोरोनाचे बळी, लॉक डाउनची स्थिती याची रोजची आकडेवारी बातमी स्वरूपात मांडणारे पत्रकार कामगार कपातीच्या धोरणात आपला कोणता सहकरी बळी गेला, याची मनातल्या मनात मोजदाद करत आहेत. समाजाचे दुःख वेशीवर मांडणाऱ्या पत्रकारांना स्वतःचे दुःख व्यक्त करता येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.
पत्रकारितेच्या आडून इतर धंदे करणारे आपले दुकान बंद पडू नये, यासाठी आटापिटा करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, अशी आरोळी देऊ लागले आहेत. त्यांनी फ्रीडम ऑफ ट्रेड साठी आरोळी ठोकावी. फ्रीडम ऑफ प्रेस अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पत्रकारांचाच अधिकार आहे, असे माने यांनी त्यांच्या निरिक्षणात म्हटले आहे.