कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या, भाजप व प्रशासन कमी पडते – शहर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, तत्काळ पावले उचलण्याची मागणी

0
265

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता महानगरपालिकेचे प्रशासन व प्रशासनावर ज्यांची सत्ता आहे असे सर्व लोकप्रतिनिधी अशा काळामध्ये नागरिकांच्या आजच्या कोरोना मुळे झालेल्या भयानक परिस्थितीत सुविधा पुरवण्यात कमी पडत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपवर थेट हल्ला चढविला. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी नेते नाना काटे, पक्षाचे शहरा कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थत होते. कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देणअयासाठी काय करावे याबद्दलचे सुचनावजा निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

.निवेदनात ते म्हणतात, शहर म्हणून शहराचा विकास आज ना उद्या आपण सर्वजण करणारच आहोत. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविणे व त्यासाठी असलेल्या या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे व त्यासाठी वेळ पडली तर महानगरपालिकेची तिजोरी पूर्णपणे रिकामे करणे यांची मानसिकता आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत
नाही. त्यामुळेच श्रीमंत समजले गेलेल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रुग्ण नागरिकांना खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा जागा उपलब्ध होत नाहीये हे या शहरातील नागरिकांचे दुर्दैव आहे.
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हजारो रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या सर्वांवर उपचार करण्यासाठी असणाऱ्या खाजगी रुग्णालये व महानगरपालिकेचे रुग्णालयांची जागा कमी पडत असून अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला प्रशासन कमी पडत आहे असे काही ठिकाणी जाणवत आहे.
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्यावर आवश्यक ते उपचार होणे सुद्धा गरजेचे आहे. आयुक्त म्हणून विशेष अधिकारत आम्ही सुचवीत असलेल्या काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करावी व त्यासाठी योग्य निर्णय घेणे व कारवाई करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.

१) पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स या कंपनीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे 5000 बेडचे रुग्णालय उभे करता येऊ शकेल का? त्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या नियोजनासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करावी. (यासाठी उद्योग प्रदर्शनाचे कमी वेळेत तयार होणारे मोठे वॉटरप्रूफ मंडप टाकता येवू शकतात.)
२) पिंपरी-चिंचवड शहरातील OYO कंपनीचे व त्या प्रकारचे इतर सर्व हॉटेल्स व रूम्स ताब्यात घेवून व त्या ठिकाणी उपचार व्यवस्था करावी. येथे स्वतंत्र रुम टायलेटची व्यवस्था उपलब्ध असते.
३) पिंपरी-चिंचवड शहराला शेजारील हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कंपन्या असल्याने याठिकाणी हजारोंच्या संख्येने मध्ये छोटे-मोठे हॉटेल्स, होस्टेल, सर्विस अपार्टमेंट अशा व्यवसायिक स्वरूपातील मिळकतीच्या ज्या आज बंद स्वरूपात आहेत. (त्या आपण तात्पुरते स्वरुपात रुग्णालय किंवा उपचार केंद्र आणून वापरू शकता.)
४) पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे रूमचे तारांकित, पंचतारांकित किंवा लॉजिंग -बोर्डिंग असणारे सर्व हॉटेल्स व त्याच्या रूग्ण रुग्णांकरिता उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही
करावी.
५) शहरात असणाऱ्या मोठ्या उद्योगांपैकी कोणत्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचे रुग्णालय उभा करता येईल याची पाहणी करून त्याबाबतचा निर्णय घ्यावा. (मोठे शेड उपलब्ध झाल्यास कमी वेळात उपचार केंद्र होईल.)
६) लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरांमध्ये पॉझिटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खुल्या असणाऱ्या बाजारांमुळे अनेक अडचणी येत आहेत असे दिसते. त्यामुळे आज असणाऱ्या लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन यांना आदेश द्यावे.
७) आपणाकडून महानगरपालिकेच्या अनेक अनावश्यक कामांसाठी सल्लागार नेमले आहेत. आपल्या नागरिकांच्या जीवाशी असणाऱ्या रोगाशी लढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी संस्था किंवा कंपन्यांना सल्लागार म्हणून नेमावे.
८) केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी महानगरपालिकांच्या विकासकामांवर बंधने घातली आहेत. तरी देखील आपणाकडून अनेक अनावश्यक कामे केली जात आहेत त्यावर आपले नियंत्रण नाही व केवळ सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे हा खर्च करण्यासाठी आपण मान्यता देत आहात. त्यापेक्षा आज रोजी कोरोना रोगाला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी कितीही खर्च झाला तरीही कोणताही राजकीय पक्ष विरोध करणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या विशेष अधिकारात कारवाई करावी.
९) शहरात वाढणारी रुग्ण संख्या त्यांना आवश्यक असणाऱ्या बेडची संख्या, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, आवश्यकतेनुसार मशिनरी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे, गोळ्या, वाहने,इतर स्टाफ, सुरक्षात्मक व
संरक्षणाची साधने, पोलीस यंत्रणा, पोलीस यंत्रणेसाठी आवश्यक ती साधने व उपाय योजना तसेच प्रसंगी खाजगी कॉन्ट्रक्ट करून सर्व बाबींचे नियोजन करून आयुक्तांनी विशेष अधिकारात आवश्यक तरतूद करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
१०) महानगरपालिकेने केवळ मास्क वाटप करणे, अन्नधान्य पुरवठा करणे, सॅनीटायझर पुरवठा करणे, परिसर साफ करणे या व्यतिरिक्त उपचार पद्धतीसाठी आज आहे त्यापेक्षा अधिकचे
नियंत्रण व नियोजन केले पाहिजे.
११) महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आपण व सत्ताधारी लोकांनी शहरातील प्रमुख व्यक्तींना अशा प्रकारच्या आपत्कालीन नियोजनात सहभागी करून घेऊन शहराचा धोका कसा कमी होईल. याबाबत त्यांचा विचार ऐकून घ्यावा व त्यानुसार पुढील कारवाई करणे सोपे कसे होईल याबाबतचे नियोजन करावे.
१२) आम्ही आमच्या वतीने व आमच्या पक्षाच्या वतीने आपण दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडू तसेच योग्य वेळेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य या शहराला व शहरातील नागरिकांच्यासाठी एक जबाबदारी व कर्तव्य म्हणून करू ही आम्ही या पत्राद्वारे आपणास खात्री देत आहोत.

१३) आयुक्तांनी जून अखेरपर्यंत शहरात ३००० पॉझिटिव्ह रुग्ण असतील हे भाकित खरे झाले असेल तर जुलै अखेर १०००० होतील हे सुद्धा भाकीत खरे होण्याच्या अंदाजाने आम्ही आपणास काही सूचना केल्या आहेत .याबरोबरच ही संख्या इतकी होणार नाही याची जर उपाययोजना केली व लोकडाऊन बाबतचे शहराचे नियमावली काटेकोर केली तर ही वेळ येणार नाही हेसुद्धा जाहीर केले तर नागरिकांच्या जीवास कमी धोका राहील.
त्यामुळे शहरातील राज्यकर्त्यांनी व प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे निवेदनात म्हटले आहे