‘कोरोनाची तिसरी लाट येवो न येवो, पूर्ण तयारी करा’

0
228

नागपूर, दि. ९ (पीसीबी) : कोरोनाची तिसरी लाट येवो न येवो, पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका. विशेषत: करोना संक्रमणाच्या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल, यासाठी डॉक्टर मंडळीच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आभासी कार्यक्रमात गडकरी संवाद साधत होते. कार्यक्रमात डॉ. अशोक कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. करोनाच्या दोन लाटातून आपण खूप शिकलो आहे. पहिल्या लाटेवेळी आपल्याकडे सोयी सुविधा नव्हत्या. म्हणून तिसरी लाट आली तर आपण सामना करण्याच्या पूर्ण तयारीत असलो पाहिजे. थोडेही लक्षणे दिसले की लगेच तपासणी केली पाहिजे, असे सांगून गडकरी यांनी मोबाईल तपासणी प्रयोगशाळा, प्राणवायूची व्यवस्था, रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था आणि अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन निर्मितीची व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था कशी केली याची माहिती दिली. प्राणवायू निर्मितीत आपण आत्मनिर्भर असले पाहिजे. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आपल्याकडे होता. पण आता काहीशी सवड मिळाली असताना प्रत्येक डॉक्टरांनी आपल्याला पाहिजे त्यापेक्षा दुप्पट सिलेंडरची व्यवस्था केली पाहिजे. हवेतून प्राणवायू निर्मिती करण्यावर आपला भर आहे. तसेच बंद दवाखान्यांचा उपयोग करीत डॉक्टरांनी रुग्णशय्या वाढवण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक उपकरणासह युक्त आपले रुग्णालय व्हावे असे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत, असेही ते म्हणाले.

कोरोना संक्रमणाच्या काळात ज्या उपचारांमुळे फायदा होईल ते उपचार आपण केले पाहिजेत. आपल्याला फायदा झाला तर तो अनुभव इतरांपर्यंत आपण पोहोचवावा. प्रत्येकाला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे कार्यकर्त्यांची राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी ठरते. सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, यामुळे दीनदलितांची सेवा हाच खरा धर्म असून ही सेवा निरपेक्ष भावनेने करावे. आपला उद्योग, व्यापार सांभाळून आपल्याला हे कार्य करायचे आहे. करोनाच्या संकटावर मात करून आपण विजयी होऊ , असा विश्वास समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.