कोरोनाचा रूग्ण असेल अशा शहरांमध्ये घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य – गृहमंत्री

0
366

मुंबई,दि.९(पीसीबी) – ज्या शहरांमध्ये कोरोनाचा रूग्ण असेल अशा शहरांमधल्या नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. जर अत्यावश्यक सेवेसाठी किंवा तुमच्या गरजेच्या कामासाठी उदा. किराणा दुकानात जाणे, मेडिकलमध्ये जाणे किंवा भाजीपाला आणण्यासाठी जाणे. याकरिता जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर मास्क असणं गरजेचं आहे. जर मास्क नसेल तर शासन आता त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुंबई पुणे नागपूरसह उर्वरित महाराष्ट्रात कोरोना आता अधिक वैगात फैलावत आहे. लॉकडाऊन असून देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक तसंच ज्या ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव आहे त्या शहरामधल्या नागरिकांनी सरकारी सूचनांचं पान करावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा गृहमंत्री देशमुख यांनी दिला आहे.