Pune

कोरोनाचा भुर्दंड, दाढी-कटिंग दर दामदुप्पट

By PCB Author

June 01, 2020

पुणे, दि. १ (पीसीबी) : लॉकडाऊन काळात पूर्ण सामान्य जनतेचे अर्थकारण कोलमडलेले आहे. त्यातच आता महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लॉकडाऊन काळात लांबलचक वाढलेली दाढी आणि कटिंग करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॉकडाऊन पूर्वी कटिंगचा दर हा 60 ते 80 रुपये होता. मात्र आता नवीन दरानुसार ग्राहकाला 100 ते 120 रुपये द्यावे लागणार आहेत. तर दाढीचा पूर्वीचा दर हा 40 ते 50 रुपये होता मात्र आता ग्राहकांना दाढीसाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. पीपीई किटसह इतर साहित्य खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांचा खर्च वाढणार आहे, त्याचबरोबर दुकान भाडं, लाईट बिल आणि घर खर्च संभाळण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेचे राज्यभरात सभासद असून पुण्यात साधारण 15 हजार सलून दुकानदार या संघटनेचे सभासद आहेत. “लॉकडाऊनदरम्यान सलून व्यवसायिक अस्तित्वाची लढाई लढत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद आहे. सलून व्यवसायिक अधिक अडचणीत आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सलून चालू आहेत तर काही भागांमध्ये बंद आहे. ज्या भागांमध्ये सलून बंद आहेत, त्या भागांमध्ये चालू करण्यात यावे, अशी विनंती सरकारला करतो”, असं महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद म्हणाले.