कोरोनाचा फटका आणखी कोणाकोणाला, वाचा…

0
242

नवी दिल्ली, दि. २१(पीसीबी) : कोरोनामुळे देशविदेशातील विविध व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या घाट्यात आल्याने त्यांनी कर्मचारी कपात सुरू केली. आता टॅक्सी सेवा पुरविणाऱ्यांपैकी अग्रगन्य अशा कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी घरी पाठवायचा निर्णय घेतला आहे.दोन महिन्यांच्या टाळेबंदिमुळे प्रचंड तोटा आल्याने सुरवातीला उबेर कंपनीने अनावश्यक असे ३००० कामगार कमी केले. आता ओला कंपनीनेही 1400 कर्मचाऱ्यांना एका रात्रीत नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी एक नोटीस जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनामुळे कंपनीचं उत्पन्न घटल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असं भावेश अग्रवाल यांनी सांगितलं.

आपल्या निवेदनात अग्रवाल म्हणतात, गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे भावेश अग्रवाल यांनी या नोटीसमध्ये सांगितलं. भावेश अग्रवाल यांच्या मते, गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीचे उत्पन्न 95 टक्क्यांनी कमी झालं आहे. त्यामुळे कंपनीवर ही वाईट वेळ आली आहे.
देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून ओलाने कॅब सर्व्हिसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे कॅब व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

उबरही 3000 कर्मचाऱ्यांना काढणार
कोविड-19 मुळे उबरनेही जगभरातील आपल्या 3,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची घोषणा केली. कोरोनामुळे कंपनीपुढे अनेक आर्थिक आव्हानं उभी झाली आहेत. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचं उबरने सांगितलं.

स्विगी, झोमॅटोही कर्मचऱ्यांना काढणार
त्याशिवाय, फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपनी स्विगी आणि झोमॅटोनेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी येत्या काही दिवसात त्यांच्या 1100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे. तर झोमॅटोही त्यांच्या 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार आहे.