कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्लोबल टेंडर पध्दतीने लस थेट प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडुन खरेदी करणार – महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे

0
321

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – संपुर्ण देशासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुध्दा कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजने अंतर्गत सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय ठरलेला आहे. पिंपरी चिंचवड कोरोनामुक्त होण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव व कोरोना मुक्त शहर हा उददेश्य साध्य करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडुन ग्लोबल टेंडर पध्दतीने लस थेट खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी दिली. लस खरेदी संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे यांना पत्रानुसार सुचना करण्यात आल्याचेही महापौर यांनी सांगितले.

सद्यस्थितीमध्ये शहरासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस शासनाकडुन अत्यंत अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यास बराच कालावधी लागु शकतो. शासनाने अगोदरच लसीकरणाबाबत नियमावली लावलेली आहे. तसेच, शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यानुसार लस देखील त्याच प्रमाणात आवश्यक आहे. शासनाकडून शहरासाठी जो लसींचा साठा उपलब्ध होतो, त्यातही शहराबाहेरील नागरिक नोंदणी करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते.

संभाव्य कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेपासुन नागरिकांना वाचविण्यासाठी महापालिकेच्या निधीतुन उत्पादित कंपन्यांकडुन कोरोना प्रतिबंधात्मक लस ग्लोबल टेंडर पध्दतीने थेट खरेदी करणार आहे, त्यासाठी शहरात वाढणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना त्यापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या निधीतुन लस उत्पादित कंपन्यांकडुन कोरोना प्रतिबंधात्मक लस थेट खरेदी करण्यासंदर्भात स्थायी समितीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यासाठी तात्काळ ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबवुन लस खरेदी करण्यात येणार आहे, असेही महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी सांगितले.