कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा लॉकडाऊनची गरज; सर्वपक्षीय नेते, उद्योजक व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा – जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांचे आवाहन

0
675

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आठवड्यापुर्वी १५० ते १७५ अशा सरासरीने रुग्णांची संख्या वाढत होती, आता गेल्या दोन दिवसांत हे प्रमाण जवळपास दुपटीने म्हणजे ३०० ते ३२५ च्या सरासरीने पुढे चालले आहे. ही शहरासाठी धोक्याची घंटा आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनी वाढत्या कोरोनाचा बंदोबस्त कऱण्यासाठी पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय एकमुखाने घेतला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. लोकांचा संपर्क कमी होऊन रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाउल उचलावे लागले. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट तीव्र होत आहे, पण कोरोणाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी त्याशिवाय दुसरा पर्यांय आतातरी समोर दिसत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे. एकटे आयुक्त किंवा महापालिकेचे पदाधिकारी काही करू शकत नाहीत. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, उद्योजक, व्यापारी व मान्यवरांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आजवर अत्यंत चागले काम केले. त्याचा परिणाम शहरात कोरोना नियंत्रणात राहिला होता. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर अशा काही शहरांतील कोरोना रुग्ण, मृतांची संख्या असा सारासार विचार केला असता पिंपरी चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली हे मान्य करावेच लागेल. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, मागचा लॉकडाऊन खुला केल्यापासून गेल्या आठ – दहा दिवसांत परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसते आहे. जिथे रोज कसेबसे २५-३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते तिथे गेल्या आठवड्यात २०० – २५० ची वाढ होत होती. आता तर गेल्या दोन दिवसांत हे प्रमाण ३०० ते ३२५ च्या सरासरीने पुढे चालले आहे. लोकांचा संपर्क वाढत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. अवघ्या सात दिवसांत जवळपास १३०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, अशी चिंता सावळे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या पिंपरी चिंचवड शहराला रेडझोनमधून सुट मिळाली कारण नियंत्रण होते, आता ती परिस्थिती दिसत नाही. बाजारपेठेत, दुकानांतून लोक गर्दी करतात. तोंडाला मास्क असतो पण तोंड सोडून हनुवटीवरच लटकत असतो. फिझीकल डिस्टन्सिंगचा पार बोऱ्या वाजला आहे. लोक एकत्र बसून गप्पा मारतात, बैठका घेतात, सामाजिक कार्यक्रम घेतात असे सर्रास चित्र दिसते. सॅनिटायझेशनचा वापर सुरवातीला होत असे आता त्यातही घट झाली आहे. बहुतांशी दुकानांतून नियमांचे पालन होत नाही. दुचाकीवर एकाच आणि चार चाकिमध्ये दोघांना परवानगी आहे. प्रत्यक्षात दुचाकीवर तिघे-चौघे बसून जातात. चार चाकीत सुध्दा पाच-सहा जण बसून जातात. रिक्षांधमधून दोन व्यक्तींची परवनागी असताना तीन-चार बसून जातात. तीन महिन्यांच्या बंदोबस्तामुळे तमाम पोलिस यंत्रणा थकली आहे. किमान पाऊनशेवर पोलिस कोरोनाग्रस्त आहेत. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने हैराण केले आहे. आपले आमदार, नगरसेवक आणि त्यांची कुटुंब व कार्यकर्तेसुध्दा कोरोना बाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणी कोणावर नियंत्रण ठेवायचे हा प्रश्न आहे.

जून मध्ये ३००० रुग्ण होतील असे भाकित महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते. आता जुलै अखेर १०,००० रुग्ण असतील असे त्यांनी म्हटले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रुग्णांवर उपचार करायला आपल्याकडे पुरेशा प्रमाणात जागा शिल्लक नाही. त्यासाठी परिसरातील शाळा, मैदाने, लग्नासाठीची कार्यालये ताब्यात घेतली पाहिजे. यंत्रणा, मनुष्यबळ, साहित्य याची कमतरता पडण्याची शक्यता आहे. शहरातील गणेश मंडळे, संस्था, संघटना, औद्योगिक कंपन्या यांच्या मदतीची प्रशासनाला मदत लागणार आहे. पालखी सोहळा रद्द झाला, गणेशोत्सव रद्द झाल्यात जमा आहे. नवरात्र, दसरा-दिवाळीचेसुध्दा कठीण दिसते. अशातच भारत-चीन सिमेवर तणाव असल्याने दुसरे मोठे संकट समोर ठाकल्याने देश, सरकार अडचणीत आहे. काळ अत्यंत बिकट आहे. पुढचा काळ हा आपणा सर्वांची कसोटी पाहणारा आहे. शहरातील सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सुज्ञ नागरिक माझ्या या मताशी सहमत असतील असे मला वाटते, असे सावळे यांनी म्हंटले आहे.

सामाजिक दायित्वाच्या भावनेने या लढाईत तूर्तास सर्व राजकीय मतभेद बाजुला ठेवून नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी व मान्यवरांनी तातडीने एकत्र येण्याची नितांत गरज आहे. इथे कोण कोणत्या पक्षाचा अथवा कोण कोणत्या जाती धर्माचा याचा प्रश्नच येत नाही. मनुष्य हीच एक जात समजून सर्वांनी एकत्र बसून निर्णय करावा असे वाटते. महापालिका, पोलिस आणि तमाम राजकीय मंडळी यांनी एकत्र हातात हात घालून काम केले तर या महाकाय संकटावर आपण मात करू शकतो याची खात्री वाटते. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनी वाढत्या कोरोनाचा बंदोबस्त कऱण्यासाठी पुन्हा एकदा कडेकोट लॉकडाऊनचा निर्णय एकमुखाने घेतला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात देखील १०-१२ दिवसांसाठी लॉकडाऊनचा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. असा कठोर निर्णय घेताना लोकसहभाग महत्वाचा आहे, एकटे आयुक्त काही करू शकणार नाही. यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, व्यापारी, उद्योजक व इतर मान्यवरांनी एकत्र यावे, असे आवाहन सिमा सावळे यांनी केले आहे.