Maharashtra

‘कोरोना’चा धोका संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

By PCB Author

March 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असं आवाहन त्यांनी केले आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचे आयोजन करुन सामुहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं, परंतु शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा कोरोन विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता बीड जिल्ह्यासह राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत यावर्षीचा गुढीपाडवा (दि.२५) घरी राहूनच साजरा करावा, कोणीही नाहक रस्त्यावर उतरू नये, घरी राहूनच हा लढा यशस्वी करण्याच्या संकल्पाची गुढी सर्वजण उभी करू, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासह राज्यातील जनतेला गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.