Desh

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मोदी-शाह यांची बैठक

By PCB Author

July 11, 2020

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – कोरोना व्हायरसच्या देशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही सहभाग असणार आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही पुढे गेली आहे. अशा सगळ्या स्थितीत काय करता येईल ? लॉकडाउनचं काय, अनलॉकचं काय या सगळ्यावर चर्चा झाली. चाचण्या वाढवणं किती आवश्यक आहे ? या सगळ्यावरही या बैठकीत चर्चा झाली. एएनआय ने यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखांच्याही पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. या वाढत्या संख्येवर उपाय योजण्यासाठी आणि करोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी काय करता येईल याबाबतही आढावा बैठकीत चर्चा झाली.

देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.