कोरोनचा पिंपरी शहरात उद्रेक, दिवसात 314 रुग्ण वाढले

0
294

पिंपरी, दि.2 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 314 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्णवाढ आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 3544 वर पोहोचली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.
जून महिन्यातील आकडेवारी तर चिंताजनक आहे. दररोज दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. आज एकाच दिवशी शहराच्या विविध भागातील तब्बल 314 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यात दिलासादायक बाब म्हणणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 168 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2154 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, पुण्यातील गोखलेनगर येथील 72 वर्षीय वृद्ध महिलेचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 3544 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2154 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 47 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 31 अशा 78 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1364 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.