कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे विरोधातील गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही – पोलीस अधीक्षक संदीप पाटील

0
573

पुणे, दि. १ (पीसीबी) – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आज (सोमवार) भिडे यांच्यावरील दंगलीचे सहा गुन्हे तसेच त्यांच्या तीन कार्यकर्त्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आला. मात्र या प्रकरणाचा तपास सुरुच असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावर्षी एक जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पुणे पोलिसांनी १० सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने संभाजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती मागितली होती. त्यातून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.