कोरेगाव भीमा  हिंसाचार पूर्वनियोजित; सत्यशोधन समितीचा अहवाल सादर   

0
1654

पुणे, दि. ११ (पीसीबी) – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीरोजी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट  होता. समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी या दोघांनीही हिंसाचार चिघळेल, असे वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचर हाताबाहेर गेला, असा अहवाल सत्यशोधन समितीने दिला आहे. समितीने हा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे आज (मंगळवार) सुपूर्त केला.    

कोरेगाव भीमा हिंसाचारामागे नेमके कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती. पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते.

वढू बद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठीच मिलिंद एकबोटे यांनी संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती.  संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा उल्लेख समाधीजवळच्या फलकावर केला होता. दरम्यान, हा फलक काढून  नवा फलक लावण्यात आला. त्यावर गोविंद गायकवाड यांच्याबाबत दिलेली माहिती चुकीची होती, असे लिहिण्यात आले. तसेच के. बी. हेडगेवार यांचाही फोटो या फलकावर लावला होता, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.

कोरेगाव भीमामध्ये हिंसक घटना घडताना  पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे फोनही येत होते, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा ठपकाही अहवालात  ठेवला आहे. हिंसाचार होताना पोलीस आपल्यासोबत आहेत, अशा घोषणा देण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.  पोलिसांनी वेळीच योग्य पावले उचलली असती, तर हिंसाचार टळला असता, असे सत्यशोधन समितीने अहवालात नमूद केले आहे.