कोरेगाव भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार – प्रकाश आंबेडकर

608

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याची पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना आदेश दिले होते. त्याबाबतची माहिती  आयोगाने  मागवावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आंबेडकर यांनी आज ( मंगळवारी)चौकशी  आयोगा समोर आपली  बाजू मांडली.  त्यांनी सांगितले की, कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली.  त्यानंतर मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला. मात्र,त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

या सर्वांनी आयोगासमोर उपस्थित राहावे. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. त्यामुळे या समितीने तयार केलेल्या अहवालाशी सहमत नाही. पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास आहे, असा दावाही त्यांनी केला.