कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे महापालिकेच्या सदनिकेत पुनर्वसन

0
486

पुणे, दि. १४ (पीसीबी) – कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित अशोक आठवले आणि सुरेश सकट यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन पुणे महापालिकेच्या सदनिकेत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. तसेच ही दोन्ही विस्थापित कुटुंबे एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले होती.

आठवले आणि सकट कुटुंबाना सदनिका देण्याच्या आदेशाचे पत्र उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या हस्ते कुटुंब प्रमुखांकडे देण्यात आले. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब जानराव, शहर पदाधिकारी शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते. यावेळी आठवले कुटुंबाने आपले धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करून सर्वांचे आभार मानले.

जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीत सकट व आठवले कुटुंबाचे राहते घर जळाले होते. परिणामी ही दोन्ही कुटुंबे बेघर झाली होती. दंगलग्रस्तांसमवेत त्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सध्या त्यांना कोणताही निवारा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमहापौर डॉ. धेंडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या सदनिकेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.