Pune

कोरेगाव पार्क येथे कुत्र्याला हकलले म्हणून दोघांवर कोयत्याने वार

By PCB Author

February 20, 2019

पुणे, दि. २० (पीसीबी) – कुत्र्याला हकलल्याच्या रागातून दोनजणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोरेगाव पार्कमध्ये येथे घडली.

याप्रकरणी अजित अशोक रणदिवे (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय महिपत सपकाळ (वय ४०), जय संजय सपकाळ (वय २२, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १९ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रणदिवे हे त्याचा मित्र सिद्धार्थ घायतडक यांच्याबरोबर कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरुन जात होते. यावेळी तेथील कुत्रा त्यांच्या अंगावर आला. त्यामुळे रणदिवे यांनी कुत्र्याला हाकलले. यावरुन विजय सपकाळ आणि जय सपकाळ या दोघांना राग आला. त्यांनी रणदिवे आणि सिद्धार्थ घायतडक यांना शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, तोंडावर, हातावर आणि पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच रणदिवे यांच्या दुचाकीची देखील नुकसान केले. कोरेगाव पार्क पोलीस तपास करत आहेत.