कोरेगाव पार्क येथे इराणी तरुणीला महिनाभर घरात डांबून छळ करणाऱ्या प्रसिध्द उद्योगपतीच्या मुलाला अटक

0
4807

पुणे, दि. २५ (पीसीबी) – एका इराणी तरुणीला घरात डांबून तिचा छळ करणाऱ्या एका प्रसिध्द उद्योगपतीच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रात्रीच्या सुमारास पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ‘एमआयटी ऑलंपस’ नावाच्या बंगल्यात करण्यात आली.

धनराज मोरारजी असे अटक करण्यात आलेल्या उद्योगपतीच्या मुलाचे नाव आहे. तो अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. तर परवीन घेलाची (वय ३१) अशी सुटका करण्यात आलेल्या इराणी तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीन पुण्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स करण्यासाठी इराणहून आली होती. तिथे तिची एका मित्राच्या माध्यमातून धनराजशी ओळख झाली. मे महिन्यात तेहरानहून पुण्यात आलेली परवीन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनराजला भेटली. परवीन सुरुवातीला धनराजसोबत अतिशय आनंदात होती. त्यामुळे ती धनराजच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान घरात राहू लागली. मात्र यानंतर धनराज तिला मारहाण करु लागला. त्याने तिचा पासपोर्ट, इतर कागदपत्रे आणि मोबाईलदेखील जप्त केला. त्यामुळे परवीनला तिच्यावर होत असलेला अन्याय कोणालाही सांगता आला नाही.

शनिवारी (दि.२२) डिसेंबरला धनराज त्याच्या एका मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी त्याने परवीनलादेखील सोबत नेले होते. धनराजने हॉटेलमध्ये परवीनला मारहाण केली. धनराजने कानशिलात लगावल्याने परवीनच्या चेहऱ्यावरुन रक्त येऊ लागले. त्यानंतर धनराज परवीनला घेऊन घरी परतला. त्यावेळी धनराजला एका व्यक्तीशी महत्त्वाचे बोलायचे असल्याने तो रुमबाहेर गेला. सुदैवाने त्यावेळी तो परवीनचा मोबाईल न्यायला विसरला. हीच संधी साधत परवीनने तिच्या परिस्थितीची माहिती एका मैत्रिणीला दिली. धनराज व्हॉट्स अॅप, फेसबुकवरुन जाणारे सर्व मेसेज तपासत असल्याने परवीनने इन्स्टाग्रामच्या मदतीने तिच्या अवस्थेची माहिती मैत्रिणीला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन परवीनची सुटका केली.