Maharashtra

कोरेगांव भीमा हिंसाचार; शरद पवारांनी ‘या’ तीन घटकांना धरले जबाबदार

By PCB Author

October 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – कोरेगांव भीमा हिंसाचारामागे उजव्या विचारांच्या गटाचा हात असावा, असा संशय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर व्यक्त केला होता. १ जानेवारी २०१८ मध्ये आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यामध्ये कोरेगांव भीमा येथील परिस्थिती सरकारला हाताळता आली नाही, असेही पवारांनी म्हटले होते.

या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मात्र, शरद पवारांनी या प्रतिज्ञापत्रात कोणाच्या ही नावाचा उल्लेख केलेला नाही. या प्रकरणी अनेक व्यक्तींनी आपली साक्ष स्वत:हून नोंदवली आहे. मात्र कोणत्याही राजकीय व्यक्तींनी याबाबत आपले म्हणणे मांडलेले नाही. तर शरद पवारांनी सोशल मीडियाच्या अतिरेकी स्वातंत्र्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

१ जानेवारी २०१८ पूर्वी ही घटना घडण्यासाठी विविध समाजमाध्यमांतून काही ऐतिहासिक गोष्टी जाणीवपूर्वक पसरविल्या जात होत्या. त्यामुळे  गुण्यागोविंदाने राहत असणाऱ्या   दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली. तसेच  बेरोजगारी, सामाजिक भेदाभेद, आर्थिक संधीची कमतरता आणि इतर राजकीय आणि सामाजिक घटकांचा परिणाम जातीय अस्मितांवर झाला. समाजमाध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मध्ये सुधारणा करण्याची गरज पवारांनी या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे.