कोयत्याच्या धाकाने लूटमार आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना अटक; जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल

0
426

पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) : व्यावसायिक कामानिमित्त मित्रासोबत जात असलेल्या तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देत पैसे आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर बाजूलाच पार्क केलेल्या एका आयशर टेम्पोच्या काचा फोडल्या. आयशर टेम्पो चालकाला देखील कपयत्याचा धाक दाखवून टेम्पोमधून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले. याबाबत तीन जणांवर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री 10 वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली.

मुस्ताक मजीद शेख (वय 32, रा. अकुर्डी), इम्तियाज मुस्ताक शेख (वय 25, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या 17 वर्षीय साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रियाज कासीम हालयाळ (वय 28, रा. श्रमिक नगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सादिल आदिल मंसोरी अंकुश चौक निगडी येथे अमीन शेख यांनी चिकन मालाचे पैसे देण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी तिथे गेले. इम्तियाज याने कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांचा शर्ट फाडून खिशातून 6 हजार 430 रुपये आणि10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. जवळच पार्क केलेल्या एका आयशर टेम्पोच्या काचा फोडून नुकसान करत परिसरात दहशत पसरवून आरोपी पळून गेले.

आयशर टेम्पो चालक नफिज सलीम शेख (वय 36, रा. अंकुश चौक, निगडी) यांनी दुसरी फिर्याद दिली आहे. नफिज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा आयशर टेम्पो (एम एच 43 / ई 7438) अंकुश चौकात पार्क केला होता. आरोपींनी लोखंडी रॉड आणि कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपींनी टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डमधून तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले.