कोथरूडमध्ये पराभव करणार; रुपाली चाकणकरांचे आमदार मेधा कुलकर्णींना आव्हान

0
2103

पुणे, दि. २८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून  भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचा पराभव करू, असे आव्हान  राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.  सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे आव्हान दिले आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात कुलकर्णी आणि चाकणकर यांच्यामध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.   

मेधा कुलकर्णी सातत्याने जातीय विधाने करुन समाजामध्ये तेढ निर्माण करत आल्या आहेत.  त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचा निर्धार चाकणकर यांनी बोलून दाखवला आहे.

मेधाबाई, आपण सातत्याने मराठा समाज आणि बहुजन समाजाचा अपमान करताय, या समाजात तेढ निर्माण करता. या समाजातील लोकांनी देखील आपल्याला मतदान केले असेलच ना. त्यांना तर पश्चाताप होतच असेल, पण यावेळी तुम्हाला कोथरूडमधून हरवू हे आमचं तुम्हाला आव्हान आहे. लाटेत आलात…लाटेत जाणार, असे चाकणकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे  रुपाली चाकणकर खडकवासला मतदारसंघातून  विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी कोथरूडमधून कुलकर्णी यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे.