कोण कुणाला आडवं करतं, ते येणाऱ्या निवडणुकीत बघू – खासदार उदयनराजे

0
1308

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अनेकजण म्हणतात, उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं ते येणाऱ्या निवडणुकीत बघू. जनतेला वाटलं तरच मी निवडणूक लढणार, कारण जनता हाच माझा पक्ष आहे, असे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (मंगळवार)  मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, कामानिमित्त मी मंत्रालयात नेहमी येत असतो. कामानिमित्त मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीचे बैठकीत उदयनराजेंच्या खासदारकीच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केला. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले की, कुणाला वाटत असेल की मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन, असे सरळ आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते, माझा त्याला विरोध नाही. लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो, असे ते म्हणाले.