Pune

कोण आदित्य ठाकरे ?…तो एक आमदार..

By PCB Author

August 02, 2022

पुणे, दि. २ (पीसीबी) : शिंदे गट उदयास आला यामध्ये आ. तानाजी सावंत यांचाही मोठा रोल असल्याचे सांगितले जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान आ. तानाजी सावंत यांच्या घराशेजारी आ. आदित्य ठाकरे यांचे देखील शक्तीप्रदर्शन होत आहे. मात्र, त्याने काही फरक पडणार नाही. सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्याच्यावर एकेरी टिकास्त्र केले. शिवाय आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी कार्यालयाची तोडफोड केली त्यांनीही आवकातीमध्ये रहावं..कुणाशी पंगा घेताय हे डोक्यात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कार्यालय शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादीने फोडले तानाजी सावंत यांचा बंडामध्ये सहभाग आणि त्या दरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका पाहता पुणे येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, तोडफोड शिवसैनिकांनी नाहीतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. त्या दरम्यानच्या काळात दोनवेळेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. शिवाय राज्याच इतर ठिकाणीही तीव्र पडसाद उमटले होते.

शक्ती गेल्यानंतरचे हे शक्तीप्रदर्शन आज पुणे येथे आदित्य ठाकरेही दाखल होत आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून त्यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे. यावर तानाजी सावंत यांनी मात्र, सडकून टिका केली आहे. शक्ती गेल्यानंतर शक्तीप्रदर्शन करुन काय उपयोग. सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आणि ते आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे अशी टिकाही सावंत यांनी केली.