Desh

कोणताही व्यवसाय नसताना राहुल गांधींच्या संपत्तीत वाढ कशी ? – भाजप

By PCB Author

March 24, 2019

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २००४ मध्ये आपल्या नामांकन अर्जात ५५ लाख रूपये संपत्ती जाहीर केली होती. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ती ९ कोटी रूपयांची कशी झाली ? इतकी मोठी वाढ कशी झाली, त्यांच्या कमाईचे एकमेव साधन म्हणजे ते खासदार आहेत. ते डॉक्टर नाहीत किंवा वकीलही नाहीत, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील महरोली येथील एका फार्म हाऊसवरुन संबित पात्रा यांनी आरोप केले आहेत. तसेच जमीन व्यवहार, फार्म हाऊसपासून मिळणारे भाडे आणि एका संपत्तीच्या व्यवहाराबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मानहानीचा खटला दाखल करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.

ते म्हणलो, ही सुमारे ५ एकर जमीन आहे. याची मालकी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याकडे आहे. इंदिरा फार्म हाऊस असे याचे नाव आहे. २०१३ मध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी इंडिया लि. नावाच्या एका कंपनीला भाड्याने देण्यात आले होते. महिना ७ लाख रूपये भाड्याने हा फार्म हाऊस देण्यात आला होता. पहिल्यांदा यासाठी ४० लाख २० हजार रूपये आगाऊ घेण्यात आले. ही रक्कम व्याजमुक्त होती. या व्यवहारावरच पात्रा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.