कोट्यावधी रुपयाचा बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

0
613

पुणे, दि. २० (पीसीबी) – सुमारे दोन वर्षापूर्वी कुरकुंभ ता.दौंड येथील एका बेरोजगार युवकास इसम नामे नितीन तानाजी जाधव रा.कल्पनानगर, बारामती व आकाश काशिनाथ डांगे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा यांनी आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून आकाश डांगे याने फसविले. तो इंडीयन नेव्हीमध्ये नेमणुकीस नसताना सुद्धा इंडीयन नेव्हीचा ड्रेस घालून अधिकारी आहे, असे भासवून दोघांनी त्या तरुणाकडून भिगवण व लोणावळा येथे एकुण ३ लाख ८० हजार रूपये घेतले. आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाचे बनावट ई मेलवरून इंडीयन नेव्हीचे बनावट नियुक्ती पत्र, मेडीकल पत्र व अॅडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता त्या तरूणाची तसेच त्याचेसारखे अनेक बेरोजगारांची फसवणूक केली आहे. त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे तक्रार (गुन्हा रजि.नं.३०४/२०२०) दाखल आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 गुन्हयातील फिर्यादी किशोर दादा जाधव रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे हा तरुण नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना भेटला व  फसवणूकीचा झालेला प्रकार सांगितला. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली. सदर तरुणासह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती मिळाली. त्या दोन ठगांनी अनेक बेरोजगार युवकांची फसवणूक करून त्यांचे आयुष्य धुळीस मिळवले होते.

देशाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने तात्काळ पुणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासास सुरुवात केली. या पथकाने गुन्हयाची माहिती घेवून बारामती येथून आरोपी नामे नितीन तानाजी जाधव वय ३० वर्षे रा.कल्पनानगर, बारामती यास ताब्यात घेतले. त्याचेकडे मिळालेल्या माहितीनुसार रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश काशिनाथ डांगे वय २५ वर्षे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा यास फलटण येथून ताब्यात घेतले. दोघांकडे प्राथमिक चौकशी केला असता त्यांनी पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीचे एजंटमार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख याप्रमाणे कोट्यावधी रूपये घेवून फसवणूक केल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनला दाखल झालेले फसवणुकीचे गुन्हयात दोघांना अटक करण्यात आलेली आहे. 

गुन्हयाचा पुढील अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत. सदर गुन्हयात आरोपींचे आणखीन साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार,  सचिन गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे. सैन्यदलात नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेले बेरोजगार तरुण आपल्याला नोकरी मिळेल किंवा आपण दिलेले पैसे आज उदया परत मिळतील या खोट्या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.