कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर गुन्हा

0
543

पुणे, दि. २८ (पीसीबी) –  सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी सध्या तरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर तसेच अॅड. साधना वर्तक यांच्यासह तिघा जणांवर कोथरूड पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शनिवारी (दि.२७) रात्री कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी एका ५२ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक मानकर, त्यांची निकटवर्तीय अॅड. वर्तक आणि मुकुंद परशुराम दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ५२ वर्षीय महिलेने तिचा भूखंड विकसित करण्यासाठी मानकर यांना २००३  मध्ये दिला होता. या दरम्यान, मानकर यांनी त्या महिलेचा दीर मुकुंद दीक्षित यांच्याकडूनही एक जागा घेतली. त्याचा मोबदला देण्याऐवजी त्यांनी त्या महिलेच्या जागेची बनावट कागदपत्रे तयार करून मुकुंद दीक्षित यांना दिली. तसेच त्या महिलेची आणखी एक जागा बळकावली, असेही तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण व्यवहारात संबंधित महिलेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानंतर शनिवारी रात्री कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या दिपक मानकर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आला असून तरुगात धाडण्यात आले आहे.