कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

0
214

सांगवी, दि. २१ (पीसीबी) – कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगून एकाची एक लाख 78 हजार 400 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 जानेवारी 2018 ते 19 जुलै 2018 या कालावधीत जुनी सांगवी येथे असताना ऑनलाइन घडली.

सुहास अरविंद पाटील (वय 48, रा. हिरकणी हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) यांनी सोमवारी (दि. 20) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंडियन मनी डॉट कॉम, सुव्हिजन होल्डींग प्रा. लि. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर कुणाल व रोहन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज आवश्‍यक होते. इंडियन मनी डॉट कॉम, सुव्हिजन होल्डींग प्रा. लि. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर कुणाल व रोहन यांनी फिर्यादी यांना फोन, व्हॉटस्‌ऍप कॉल व मेसेज करून कर्ज देण्याचे आमिष दाखविले. तसेच कर्जासाठी विविध प्रकारच्या फी ऑनलाइन भरण्यास सांगून फिर्यादी यांची एक लाख 78 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.