Maharashtra

कोकणात राष्ट्रवादीला धक्का; आमदार भास्कर जाधव शिवबंधनात

By PCB Author

September 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर चे आमदार भास्कर जाधव यांनी आज (शुक्रवार) दुपारी २ वाजता मुंबईत मातोश्रीवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  ठाकरे यांनी जाधव यांच्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे  खासदार संजय राऊत, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. 

भास्कर जाधव हे दोन वेळा गुहागर मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर तब्बल ७२ हजार ५२५ मतांसह विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या डॉ. विनय नातू  आणि शिवसेनेच्या विजय कुमार भोसले   यांचा पराभव केला होता.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी आज (शुक्रवार)  आमदारकीचा राजीनामा दिला. सकाळी औरंगाबाद येथे जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. जाधव यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे कोकणात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.