कोकणात जागा, आंब्याची कलमे, बंगला देण्याच्या बहाण्याने तिघांची तब्बल 72 लाखांची फसवणूक; तिघांना अटक

0
432

निगडी, दि. २० (पीसीबी) – कोकणात जागा, त्यात आंबीची कलमे, एक बीएचके स्लॅबचा बंगला, कंपाउंड, तीन वर्षाचा मेंटेनन्स करून देण्याच्या आमिषाने तिघांनी 72 लाख 44 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सन 2017 पासून 18 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पोयरे, देवगड, जि. सिंधुदुर्ग आणि प्राधिकरण निगडी, पुणे येथे घडला.

गणेश रामचंद्र बांदकर (वय 57), गीतांजली गणेश बांदकर (वय 55), अभिषेक गणेश बांदकर (वय 34), एकता अभिषेक बांदकर (वय 32), सागर गणेश बांदकर (वय 28, सर्व रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश, अभिषेक, सागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रवी चिंतामणी भंडारे (वय 65, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि अन्य दोघांकडून 72 लाख 44 हजार 500 रुपये घेतले. त्यांना कोकणामध्ये जागा तसेच आंब्याचे कलमे लावून, एक बीएचके स्लॅबचा बंगला, कंपाउंड, तीन वर्षांचा मेंटेनन्स इत्यादी सर्वकाही रीतसर करून देण्याचे अमिश दाखवले. तसेच हे सर्व करून न दिल्यास पैशांचा मोबदला म्हणून होणारे व्याज, दामदुप्पट रक्कम परत करण्याचे देखील आरोपींनी सांगितले.

मात्र, जे सांगितले त्यातील काहीएक करून दिले नाही. नमूद जागेचा फेरफार हा देखील राणे नावाच्या व्यक्तीच्या नावाने असल्याने फिर्यादी यांच्या नावाने जागेचा 7/12 देखील होत नाही. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.