Maharashtra

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठावाडा दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री

By PCB Author

August 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑगस्ट रोजी   मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणून  दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम्‌ करणार असे त्यांनी म्हटले आहे.   

वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्यातून पूर्व आणि  पश्चिम विदर्भाला देऊन मराठवाडा दुष्काळमुक्त  केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.  स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजवंदनानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न  गेल्या पाच वर्षांत केला आहे. गेल्या तीन-चार वर्षात कमी पावसामुळे महाराष्ट्रात काही भागात दुष्काळाचे संकट  गडद झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किलोमीटरचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे  मुख्यमंत्र्यांनी या वेळी  सांगितले.