कोकणातील काँग्रेस सोडलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली   

0
1839

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – कोकणात राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात  खळबळ उडण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या कोकणातील एका बड्या नेत्याला  पक्षात आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरु केल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळत आहे.

त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात  पक्षाचे  वर्चस्व  नसतानाही राष्ट्रवादी या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोडलेल्या कोकणातील एका बड्या नेत्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या नेत्याच्या ताकदीवरच  राष्ट्रवादीने  ही पावले उचलल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या गोटात सुरु असलेल्या हालचालींमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा काँग्रेसकडे  कायम राहावी,  असा आग्रह पक्षाकडे  धरला आहे. काँग्रेस सोडलेला संबंधित नेता मागच्या दरवाजाने महाघाडीत  सामील होण्याच्या शक्यतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये  अस्वस्थता  वाढली आहे.