कोकणचा विकास व्हावा म्हणून मी भाजपात – नारायण राणे

0
445

मुंबई, दि. १५ (पीसीबी)- कोकणचा विकास सुरु झाला होता, त्याला खिळ बसली. मात्र भाजपाच्या कार्यकाळात या विकासाला पुन्हा गती मिळाली. हा विकास पूर्ण व्हावा म्हणून मी भाजपात प्रवेश केला आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपात झाला. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. कोकणात पर्यटनाला जास्त महत्त्व आहे, ते महत्त्व अबाधित राहिले पाहिजे असेही नारायण राणे यांनी म्हटले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मी आज भाजपात विलीन करत आहे असंही नारायण राणे यांनी घोषित केले. एवढेच नाही तर यादिवसाची मी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पहात होतो असेही नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याचा विकास झाला. कोकणचा विकास होण्यासही सुरुवात झाली. हा विकास पूर्ण व्हावा एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून कोकण विकसित व्हावं या भावनेतून मी भाजपात प्रवेश केला असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केले. नितेश राणे कोकणच्या विकासासाठी चांगले काम करत असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे हे अत्यंत अनुभवी नेते आहेत असे म्हटले आहे.