कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष

0
1052

पुणे, दि. १७ (पीसीबी) –‘कॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात बँकेच्या कोअर बँकिंग यंत्रणेवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे खातेदारांची खाती व माहितीही सुरक्षित आहे. त्यामुळे खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नय,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केले आहे.

‘बँक दर वर्षी बँकेचा सर्व्हर व अन्य यंत्रणांचे सायबर ऑडिट करून घेत असते. बँकेचा सर्व्हर, स्वीच यंत्रणा, सीबीएस प्रणाली सर्व नामांकित कंपन्यांचे आहे. बँकेचा एकूण राखीव निधी १,६४६.२७ कोटी रूपये असून भागभांडवल ३५२.४७ कोटी रुपये असा बँकेकडे एकूण १,९९८.७४ कोटी रुपयांचा स्व-निधी आहे. ११२ वर्ष जुन्या बँकेच्या सात राज्यात १४० शाखा असून, बँकेचा एकूण व्यवसाय २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या घटनेचा बँकेच्या दैनंदिन व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही व होणार नाही,’असे काळे यांनी स्पष्ट केले. या सायबर हल्ला प्रकरणी बँकेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही बँकेतर्फे सांगण्यात आले.