Desh

काँग्रेसने कधीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही – नरेंद्र मोदी

By PCB Author

July 11, 2018

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी थेट पंजाबमध्ये जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पंजाबमधील मलोट येथील जाहीर सभेत काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. आपल्या भाषणाची सुरूवात पंजाबी भाषेत करणाऱ्यांनी मोदींनी पंजाबने मक्याची रोटी आणि सरसोंका साग ही जगाला दिलेली भेट असल्याचे गौरवोद्गार काढले. काँग्रेसने कधीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही. त्यांनी मागील ७० वर्षांत खोटी आश्वासने देत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. सीमेचे रक्षण असो किंवा अन्न सुरक्षा प्रत्येक ठिकाणी शीख समाज प्रेरणा देतो. पंजाबने नेहमी स्वत:पेक्षा देशाचा विचार केला असल्याचे सांगत मी मागील चार वर्षांत अनेकवेळा पंजाबमध्ये आलो आणि येथील लोकांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. मागील चार वर्षांत शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशाचे अन्न भांडार तुडुंब भरले आहे. गहू, तांदूळ, कापूस आणि डाळी अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रमी पीक घेतले आहे. शेतकरी सातत्याने कष्ट करत आहेत. पण शेतकऱ्यांकडे आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आले. मागील ७० वर्षांत ज्या पक्षावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्या पक्षाने कधी शेतकऱ्यांचा सन्मानच ठेवला नाही. या दरम्यान फक्त एका कुटुंबाचीच काळजी घेण्यात आली, असा गांधी कुटुंबाला टोला लगावला. प्रत्येक सुविधा फक्त एकाच कुटुंबाला देण्यात आली. त्यांच्यासाठीच काम करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मेहनतीकडे लक्ष दिले नाही, अशी टीका त्यांनी केली.