Desh

‘केजरीवाल कामात झिरो, आंदोलनात हिरो’ – मुख्तार अब्बास नक्वी

By PCB Author

June 18, 2018

नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) – आयएएस अधिकाऱ्यांच्या संपाबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ओढू पाहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. केजरीवाल हे काम करण्यामध्ये झिरो आणि धरणे करण्यात हिरो आहेत. करायचे तर काहीच नाही पण धरायचे सर्व काही, असा टोला त्यांनी केजरीवाल यांना लगावला. केजरीवाल हे नायब राज्यपालांच्या कार्यालयात मागील आठवड्यापासून धरणे आंदोलनास बसले आहेत. रविवारी आपच्या हजारो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला होता. परंतु, पोलिसांनी तो रोखला होता. हा धागा पकडूनच नक्वी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.

‘करने मे झिरो, धरने में हिरो, करना कुछ नही धरना सब कुछ’, हीच त्यांची प्रवृत्ती आहे. दिल्लीतील लोकांचा विश्वास ते धुळीस मिळवत आहेत, अशा शब्दांत नक्वी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. दरम्यान, रविवारी आपच्या कार्यकर्त्यांचा मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा निघाला होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तो मध्येच अडवण्यात आला. तत्पूर्वी पोलिसांनी मंडी हाऊस येथे येणार मेट्रो मार्ग बंद केला होता तसेच ठिकठिकाणी बॅरिकेट्सही लावले होते.

तत्पूर्वी, आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने एकही अधिकारी संपावर नसून सर्वजण कामावर असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. राजकारणात आम्हाला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.