Maharashtra

केंद्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय – अनिल देशमुख

By PCB Author

January 25, 2020

मुंबई,दि.२५(पीसीबी) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “कोणालातरी वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे” असा आरोप केला.

अनिल देशमुख म्हणाले, “भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास राज्य शासनाला सांगता एनआयएकडे सोपवण्यात आला. या घटनेच्या मूळाशी आम्ही जात होतो. कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये या दिशेने आम्ही तपास करत होतो,” असं देशमुख यावेळी म्हणाले. “राज्य शासनाशी कोणताही संवाद न साधता हा तपास एनआयएकडे वर्ग केला. केंद्राचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशील सल्ला घेऊन पुढील पावलं उचलू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनुसार भीमा – कोरेगाव हिंसाचाराची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली.