केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिराची उभारणी करावी – उध्दव ठाकरे   

0
401

अयोध्या, दि. १६ (पीसीबी) – केंद्र सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी,  अशी पुन्हा एकदा  मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे पत्रकार परिषदेत केली. राम मंदिर व्हावे, या प्रमुख मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केलेली आहे. आता देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार आल्याने राम मंदिर निर्माणाला वेग आला पाहिजे, अशी अपेक्षा  उद्धव यांनी यावेळी व्यक्त केली.

उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येतील रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.  यावेळी पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत आधीची अयोध्यावारी करणाऱ्या उद्धव यांनी  ‘पहले मंदिर, फिर संसद’ असा सूर लावला.  सोमवारपासून संसदेचे कामकाज सुरू होत असून रामलल्लाचे दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत आहेत, असे उद्धव म्हणाले.

अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे, ही जनतेची भावना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र काम निश्चितच करतील, हा आमचा विश्वास  आहे.  या कार्यात त्यांना आमची पूर्ण साथ राहील, असेही उद्धव पुढे म्हणाले. मोदींसाठी कोणतेच काम कठीण नाही. त्यांनी अनेक अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवलेल्या आहेत, असे कौतुकही उद्धव यांनी केले. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.