केंद्रीय यंत्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने विकसित केला देशी बनावटीचा व्हेंटिलेटर

0
233

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – कोविड-19 चा फ़ैलाव वाढत जात असताना दुसरीकडे, दुर्गपूरमधील केंद्रीय यंत्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (सीएमईआरआय)संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा व्हेंटिलेटर विकसित केला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. सीएमईआरआय चे संचालक प्रा.डॉ.हरीश हिरानी यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटरचे अनावरण करण्यात आले. दुर्गापूरमधील एका खासगी रुग्णालयाचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते.
“या व्हेंटिलेटरची रचना व विविध सुटे भाग हे संबंधित वापरकर्त्या क्षेत्राच्या गरजांनुसार मुद्दाम वेगळे तयार केलेले आहेत व किफायतशीर किमतीचाही विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेला आहे.” अशी माहिती प्रा.डॉ.हिरानी यांनी दिली. दुर्गापूरमधील दोन रुग्णालयांच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्राय आणि सूचनांनुसार सदर व्हेंटीलेटरच्या रचनेत तसेच तंत्रपद्धतीत अनेकदा बदल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. या व्हेंटीलेटवरही किंमत सुमारे 80,000-90,000 रुपये इतकी आहे. अन्य रुग्णांच्या गरजांनुसार यामध्ये पुढेही सुधारणा केल्या जाऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

‘एखाद्या रुग्णास व्हेंटीलेटरचा किती प्रभावी उपयोग होतो हे त्याची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रतिसादावरही अवलंबून असते’ अशी माहिती देऊन, डॉ.हिरानी यांनी, यापुढे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे रुग्णाच्या बदलत्या गरजेनुसार आपोआप बदल करण्यावर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
प्रा.डॉ.हिरानी यांनी बोलताना या व्हेंटीलेटरच्या रचनेतील वैशिष्ट्यांचे उपयोग विविध दृष्टिकोनातून स्पष्ट केले. या व्हेंटीलेटरचे सुटे भाग निरनिराळ्या उद्योगांमधून स्वतंत्रपणे तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे याचे प्रचंड उत्पादन हे अनेक उद्योगांना फायदेशीर ठरू शकते असे त्यांनी सांगितले. यामुळे व्हेंटीलेटरची किंमत लक्षणीय कमी होऊन आर्थिक दुर्बल रुग्णांच्या दृष्टीने तसेच सरकारी अनुदानावरील आरोग्यसेवा योजनांसाठीही ते उपयुक्त ठरणार आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचे तृतीयक क्षेत्र अद्ययावत होण्यास यामुळे मदत होणार आहे, अशी माहितीही डॉ.हिरानी यांनी दिली. नव्याने विकसित झालेल्या या व्हेंटीलेटरचे, लवकरच व्यापारी स्वरूपात उत्पादन सुरु करण्यासाठी विविध उद्योजकांशी बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रा.डॉ.हिरानी यांनी यावेळी, व्हेंटिलेटर विकसित करणाऱ्या डॉ.अनुपम सिन्हा, संजय हंसदा, कल्याण चटर्जी आणि अविनाश यादव यांच्या पथकाचे कौतुक केले.