केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

0
201

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते ग्राहक कल्याण मंत्री होते. तब्बल ५५ वर्षे राजकीय क्षेत्रात स्वतःसामर्थ्यावर दबदबा निर्माण करणारे गोरगरिबांचे प्रतिनिधी अशी त्यांची राजकीय ओळख होती. बिहारच्या राजकारणातील लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख असलेले पासवान यांचे निधन राज्यात निवडणुका सुरू असतानाच झाले आहे. पासवान यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. २०१७ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. तत्पूर्वी एन्जोप्लास्टी केली होती. दोन वेळा ह्रदयावर शस्त्रक्रीया केल्याने त्यांचे ह्रदय कमकुवत होते, त्यामुळे आता पुन्हा शस्त्रक्रीया अशक्य होती. गेले महिनाभर ते उपचार घेत होते.

आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करताना चिराग यांनी लिहिलं आहे की, “पप्पा, तुम्ही आता या जगात नाही. पण मला माहीत आहे, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल, मिस यू पप्पा.”

गेले काही दिवस त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. देशात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचे त्यांनी रेकॉर्ड केले होते. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते पंतप्रधान  एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. पंतप्रधान गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

पासवान यांनी ३२ वर्षांत ११ वेळा निवडणूक लढविली आणि ७ वेळा जिंकली. सातवेळा ते मंत्री होते. बिहार मधील हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व ते करत असतं. यावेळी त्यांचे बंधू तिथे खासदार आहेत, तर रामविलास पासवान हे राज्यसभा सदस्य आहेत.