केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या

0
952

दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – दक्षिण दिल्लीतील लक्ष्मीबाई नगर येथे केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज, स्वच्छता आणि पेयजय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएने राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास घडली.

कुंदन कुमार (वय ३१, रा. दक्षिण दिल्ली, लक्ष्मीबाई नगर, मु.रा. बिहार) असे आत्महत्या केलेल्या पीएचे नाव आहे. याप्रकरणी सरोजिनीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास सरोजिनीनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने गळफास घेतल्याचा फोन आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत कुंदन कुमारला सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ३१ वर्षीय कुंदन पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलासह लक्ष्मीबाईनगर येथे राहत होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट सापडलेली नाही. दिल्ली पोलिस तपास करत आहेत.