केंद्रातील वाघिणीची समजूत कशी काढणार? जयंत पाटलांचा मुनगंटीवारांना उपरोधिक सवाल

0
532

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – अवनी वाघिणी मृत्यूप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. यावेळी  चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कटाक्ष टाकत `केंद्रीय मंत्रिमंडळातील वाघिणीची कधी समजूत काढणार?  असा उपरोधिक सवाल केला.    

यवतमाळ जिल्ह्यात नरभक्षक अवनी वाघिणीने १४ जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे  वन विभागाने २ नोव्हेंबर रोजी अवनीला गोळ्या घालून ठार केले होते. यानंतर राज्यासह देशभर नाराजी व्यकत् करून मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनीही नाराजी व्यक्त करत मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणानंतर मनेका गांधी आणि मुनगंटीवार यांच्यात वाद धुमसत होता.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी  मुनगंटीवार यांना उपरोधिक सवाल केला.  तसेच लक्षवेधीवरील  चर्चेदरम्यान पाटील यांनी मुनगंटीवार यांच्यावर  खोचक टीकाही केली. अर्थमंत्री म्हणून भाषण करताना तुम्ही भावनाप्रधान होता. तुमच्या भावना उफाळून येतात. अशा भावना असणाऱ्याने वाघीणीला ठार मारणे योग्य दिसत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.