Desh

केंद्रातही कर्नाटक फॉर्म्युला; चंद्राबाबू नायडूंनी घेतली राहुल गांधींची भेट

By PCB Author

May 18, 2019

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आघाडी सरकार बनविण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रातही कर्नाटक फॉर्म्युला राबवण्याच्या शक्यतेवर विरोधक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज (शनिवार) भेट घेतली. 

लोकसभा निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याच पक्षाला एकहाती बहुमत न मिळाल्यास भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात  केली आहे. १९८९ प्रमाणेच तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे.

राहुल गांधींची भेट घेण्यासाठी आज सकाळी चंद्राबाबू नायडू त्यांच्या घरी पोहोचले आहेत. निकालांनंतर आघाडी करता येईल का याबद्दल गांधी यांच्याशी नायडू चर्चा करणार आहेत. गांधीची भेट घेऊन नायडू लखनऊ येथे बसपा प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार आहे.