Maharashtra

कॅन्सरच्या उपचारासाठी त्याने केल्या २२ घरफोड्या

By PCB Author

July 31, 2018

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित एका इसमाने उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी  चक्क चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे.

सलीम शेख असे या चोराचे नाव आहे. पोलिसांच्या तपासात सलीमने दादरमध्ये तब्बल २२ घरांमध्ये चोरी केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम उस्मानाबादचा रहिवासी असून तो फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सलीमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये चोरी केली होती. याठिकाणी सलीमने जवळपास ११ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र सलीमची ही चोरी यशस्वी होऊ शकली नाही. अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेट येथे सलीमची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलीमचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कॅन्सरच्या उपचारासाठी सलीमला पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची कबूली सलीमने पोलिसां समोर दिली.