कुल्लू बस अपघात; ४४ प्रवाशांचा मृत्यू, ३० जण जखमी

0
503

कुल्लू, दि. २१ (पीसीबी) – हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात गुरुवारी खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ४४ वर पोहचला आहे. घाट मार्गातून जाताना ही बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ७० ते ७५ प्रवासी होते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापैकी ४४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

बंजारहून गादागुशानी येथे जाणाऱ्या या बसमध्ये बहुतांशी प्रवासी हे विद्यार्थी होते. ते कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन घरी परत जात होते अशी माहिती समोर आली आहे. बंजारापासून एक किलोमीटर दूरवर असलेल्या भियोठ येथील एका अवघड वळणावर ही बस दरीमध्ये कोसळली. दरीत कोसळताच बसचा चक्काचूर झाला. काल संध्याकाळपर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. मात्र रात्री उशीरापर्यंत मृतांचा आकडा ४४ वर पोहचला असून सर्व जखमींना बंजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही ट्विटवरुन दु:ख व्यक्त केले आहे. ‘कुल्लू, हिमाचल प्रदेशमधील बस दुर्घटनेमुळे अतिशय दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच मी सांत्वन करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो,’ असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालानेही या घटनेसंदर्भात ट्विट केले होते. ‘कुल्लूमधील बस दुर्घटनेमुळे फार दु:ख झाले आहे. दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांचे मी सांत्वन करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. हिमाचल प्रदेश सरकारला केंद्राकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे,’ असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाच्या अकाऊण्टवरुन करण्यात आले आहे.