कुल्फी विक्रेत्याकडून लाच घेताना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात अटक

0
1287

पुणे, दि. १८ (पीसीबी) – कुल्फी विक्रेत्याला त्याचा व्यवसाय अनधिकृत आहे असे सांगून त्याच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना बिबवेवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. ही कारवाई आज (रविवार) पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिंबंधक विभाग पुणे यांनी अप्पर इंदिरानगर पोलीस चौकी येथे केली.

भिकोबा पांडुरंग देवकाते असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. या पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक भिकोबा देवकाते यांनी तक्रारदारांना तुमचा व्यवसाय अनधिकृत आहे. त्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी तक्रारदारांकडे केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तडजोड करुन दहा हजारांची लाच स्विकारताना आज अप्पर इंदिरानगर पोलीस चौकी येथे सापळा रचून देवकाते यांना अटक करण्यात आले.