Bhosari

कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरणाबाबत प्राधिकरणाने धोरणात्मक निर्णय घ्यावा – महेश लांडगे

By PCB Author

October 06, 2018

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – प्राधिकरणाने कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच प्राधिकरण हद्दीतील विकसकांनी गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्यास त्यांना आठ दिवसांत नोटिसा देण्यात यावेत, अशा सूचना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत.

आमदार लांडगे यांनी शनिवारी प्राधिकरणात आढावा बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके आदी उपस्थित होते.

महेश लांडगे म्हणाले, “प्राधिकरणातील विविध पेठांमध्ये भाडेपटट्याने वाटप केलेल्या मिळकतीचे खासगी विकसकांनी करारनामे नोंदणीकृत व कुलमुखत्यारपत्र केले आहे. कुलमुखत्यारपत्राद्वारे उभयपक्षी करारनामे केलेले आहेत. प्राधिकरणाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार भुखंड हस्तांतरणासाठी मूळ भाडेपट्टा धारकाने हस्तांतरणासाठी अर्ज केल्यानंतर हस्तांतरणाची पुढील कार्यवाही करण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात मिळकतीचे हस्तांतरण प्रलंबित आहे. त्यासाठी प्राधिकरणाने कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरणाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. प्राधिकरणाने विकसकांना ना-हरकत प्रमाणपत्र देताना रहिवाशांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली आहे का याची तपासणी करावी. आश्वासनांची पुर्तता न केलेल्या विकसकांना येत्या आठ दिवसात नोटीस देण्यात याव्यात.”