कुराणमध्ये जे लिहिले आहे त्यालाच माझ्या पक्षाचा पाठिंबा – आझम खान

0
482

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पवित्र कुराणमध्ये जे लिहीले आहे त्यालाच माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे, असे खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी म्हटले आहे. तिहेरी तलाक विधेयक आज पुन्हा एकदा लोकसभेत मांडण्यात आले, यावर खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आझम खान म्हणाले, इतर कोणत्याही धर्मांमध्ये महिलांना अधिकार दिलेले नाहीत तितके अधिकार इस्लामने दिलेले आहेत. १५०० वर्षांपूर्वी इस्लाम हा पहिला असा धर्म होता ज्याने महिलांना समानतेचा अधिकार दिला होता. आज आपण पाहतो मुस्लिम समाजात घटस्फोटांचे आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटनाचे प्रमाण कमी आहे. मुस्लिम महिलांना जाळले किंवा मारले जात नाही.

‘तिहेरी तलाक’ हा राजकीय नव्हे तर धार्मिक प्रश्न आहे तसेच मुस्लिमांसाठी कुराणशिवाय काहीच सर्वोच्च नाही. लग्नावेळी, घटस्फोटावेळी आणि सर्वच बाबींसाठी कुराणमध्ये स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि आम्ही ते पाळतो, असेही आझम खान यांनी म्हटले आहे.

पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर भाजपाप्रणित एनडीए सरकारने शुक्रवारी तिहेरी तलाक विधेयक २०१९ लोकसभेत मांडले. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात यासंबंधी अध्यादेश आणला होता. आता हे विधेयक पुन्हा त्या अध्यादेशाची जागा घेईल. हे विधेयक गेल्यावर्षी लोकसभेत पारित झाले होते. त्यानंतर विरोधकांच्या विरोधामुळे ते राज्यसभेत अडकले होते.