Bhosari

कुदळवाडीत प्लास्टीक कटींग मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू; मालकावर गुन्हा दाखल

By PCB Author

September 03, 2018

कुदळवाडी, दि. ३ (पीसीबी) – प्लास्टीक कटींग मशिनवर काम करत असताना अचानक तोल जाऊन मशिनवर पडल्याने एका १९ वर्षी तरुण कामगाराचा मृत्यू झाला. मात्र मयत  कामगाराला कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था आणि सामग्री न पुरवल्याने त्याचा मृत्यू झाल्याने गोडाऊनच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.१) सायंकाळी पाच्या सुमारास चिखली कुदळवाडीतील भारत प्लास्टीक गोडाऊन (वर्कशॉप) या ठिकाणी घडली.

रणजित रामबहादुर यादव (वय १९, रा. रविरंजन वजन काट्यामागे, गट.क्र.५४, भारत प्लास्टीक गोडाऊन, कुदळवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राम नरेश यादव (वय ३४, रा. तापकीर मिसळवाले, ता. मुळशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार भारत प्लास्टीक गोडाऊन (वर्कशॉप) या कंपनीचे मालक फारुख अहमद चौधरी (वय ३४, रा. संजय हाईट्स सोसायटी, ताडपत्रीचाळ, चिखली) यांनी कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा सामग्री आणि व्यवस्था न पुरवल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रणजित हा चिखलीतील भारत प्लास्टीक गोडाऊन (वर्कशॉप) या ठिकाणी काम करायचा आणि तेथेच रहायचा. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नेहमी प्रमाणे रणजित प्लास्टीक कटींग मशिनवर काम करत होता. यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो मशिनच्या कटरवर पडला. यामध्ये जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र रणजित काम करत असलेल्या मशीनजवळ कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती तसेच त्याला सुरक्षा सामग्री देखील पुरवण्यात आली नव्हती म्हणून त्याचा मृत्यू झाला. यामुळे गोडाऊनचे मालक फारुख अहमद चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.